कोल्हापूर : साखरेला प्रतिकिलो ६० रुपये आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघर्ष सुरू आहे. कारखानदारांच्या मागण्यांसाठीही आम्ही लढा देत असून, मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रश्नात पुढाकार घेऊन केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी केली. १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या सहकार्याने मुश्रीफ यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही गड्यान्नावर यांनी केले.
‘गोकुळ’च्या सत्तेसाठी महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या नेत्यांनी साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीसाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गडहिंग्लज कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.“श्वेतपत्रिकेच्या मागणीवरच आम्ही थांबणार नाही. ऊस परिषदेनंतर गडहिंग्लज कारखान्याच्या कारभाराचा पंचनामा केला जाईल. गरज भासल्यास कारखान्याच्या कारभाराची ‘ओपन हार्ट सर्जरी’देखील करू,” असा इशाराही राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिला.


















