नांदेड : उसाला ४००० रुपयांची पहिली उचल देण्याची शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीची मागणी

नांदेड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप उसाची पहिली उचल व अंतिम दर जाहीर केलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या वर्षी साखरेचे दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपर्यंत पोचल्याने गत हंगामातील उसासाठी प्रतिटन ५०० रुपयांचा अतिरिक्त हप्ता द्यावा आणि यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ४,००० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी प्रतिनिधींची तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. भगवान मनुरकर यांनी दिला.

साखर कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दराबाबत स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद केले. संघर्ष समितीने उसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे. तसेच ऊस गाळपानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेमेंट अदा करावे, अशी मागणी केली. ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन ऊसदरासह विविध मागण्यांवर निर्णय घ्यावा, कारखान्यांतील ऊस वजनातील कथित काटा चोरी रोखण्यासाठी कारखान्याबाहेर शासनाचे वजनकाटे सुरू करून त्यावरील वजन ग्राह्य धरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. गळीत हंगामात कारखान्यांकडून होणारी काटा चोरी व रिकव्हरी चोरी रोखण्यासाठी शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असलेले विशेष तपासणी पथक स्थापन करावे अशी मागणी समितीचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here