नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील (नासाका) मागील गळीत हंगामातील कोट्यवधी रुपयांची थकबाकी अद्याप मिळालेली नसल्याने शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित कंपनीच्या संचालकांकडून वारंवार आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात थकबाकी अदा करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत संबंधित साखर कारखान्यांना कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.माजी खासदार हेमंत गोडसे आणि शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच प्रस्तावित आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनालाही देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले आणि कामगारांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. येत्या २५ ऑक्टोबरनंतरही थकबाकी न मिळाल्यास संबंधित कारखान्यांचा गळीत हंगाम रोखून कारखान्यांना कुलूप ठोकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.या वेळी माजी खासदार हेमंत गोडसे, अनिल ढिकले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले, अंबादास ढिकले, रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले, विलास गायधनी, कैलास टिळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
आश्वासनांची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप
यापूर्वी संबंधित संचालकांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन थकबाकीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. त्या वेळी २० ऑक्टोबरपर्यंत शेतकरी आणि कामगारांची संपूर्ण थकीत रक्कम अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिलेली मुदत जवळ आली असतानाही प्रत्यक्ष पैसे मिळण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष वाढला आहे.वारंवार आश्वासने देऊनही थकीत रक्कम मिळत नसल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात थकबाकीचा प्रश्न मार्गी लागतो की आंदोलन तीव्र होते, याकडे शेतकरी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे.


















