नाशिक : एसजी एनर्जीकडील थकीत ऊस बिलप्रश्नी बेमुदत उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा

नाशिक : मालेगाव तालुक्यातील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात रावळगाव येथील एस. जी. शुगर या खासगी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. ऊस देऊन ८ महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. कारखाना कार्यक्षेत्रातील इतर शेतकऱ्यांचे ऊस बिलही थकीत आहे. यापूर्वी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन कारखान्याला अल्टिमेटम दिल्यानंतर चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करण्यात आले होते. मात्र, मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कारखान्याला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत पैसे न मिळाल्यास १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

थकीत ऊस बिलांमुळे त्रस्त झालेल्या पीडित शेतकऱ्यांनी सोमवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कारखाना प्रशासन ‘बँकेचे कर्ज मंजूर झाले की मग उसाचे पैसे देऊ’ असे सांगत आहे. मात्र, ही भूमिका चुकीची आहे. यातून शेतकरी आर्थिक कोंडीत अडकले आहेत. सध्या कारखान्याच्या साईटवर गेल्यावर तेथे कुलूप लावण्यात आल्याचे दिसते. कारखान्याच्या आवारात रखवालदाराव्यतिरिक्त कोणीही अधिकारी किंवा जबाबदार व्यक्ती भेटत नाही. हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत. कारखान्याचे कृषी अधिकारी, संचालकांशी मोबाईलवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळत नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. कारखान्याकडे वारंवार उंबरठे झिजवूनही कारखाना प्रशासन दाद देत नसल्याने प्रशासकीय मध्यस्थीची मागणी केली आहे. निवेदन देताना भारतीय किसान युनियनचे प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली चरणसिंग गिल, संजय गिल, चरणसिंग छरंग, पद्मशिंग छरंग, दत्तू रसोडा, सुशांत छरंग आदी शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here