नाशिक : ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी मजुरीवाढ आणि कमिशन वाढीसंदर्भातील त्रिपक्षीय करार तातडीने करावा, गळीत हंगाम २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी हंगाम सुरू होण्यापूर्वीच करार निश्चित करावा अशी मागणी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने केली आहे. ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता नांदगाव येथे आक्रोश जेल भरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिरामण तेलोरे, स्वरूप वाघ, कमलाकर पगारे आणि अशोक आहिरे यांनी ही माहिती दिली.
आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. संघटनेने शासनाच्या विविध योजनांची गावागावांत व वाडी-वस्त्यांवर प्रभावी अंमलबजावणी करावी, ऊसतोडणी व बैलगाडी वाहतूक दरात ८० टक्के वाढ करावी, मुकादमांचे कमिशन २५ टक्के करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आंदोलनात ऊस तोडणी मजूर, वाहतुकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


















