नाशिक : ‘नासाका’ पुन्हा संकटात; थकीत एफआरपी, कामगारांचे वेतन आणि चौकशीमुळे वाढल्या अडचणी

नाशिक: नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या चार तालुक्यांतील ३५५ गावांचा समावेश असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्यावर (नासाका) पुन्हा संकटाचे ढग दाटले आहेत. २०२२-२३ मध्ये माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झालेला हा कारखाना २०२५-२६ च्या गळीत हंगामात खासगी कंपनीकडे संचालनासाठी दिल्यानंतर आर्थिक आणि प्रशासकीय अडचणीत सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खासगी कंपनीकडे संचालन, त्यानंतर आर्थिक अडचणी

ChiniMandi WhatsApp Channel

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्याही विठ्ठल कदम यांच्या आग्रहास्तव कारखान्याचे संचालन पुण्यातील एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले. संबंधित कंपनीने केवळ ६० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती बिघडल्याचे सांगितले जात आहे. सध्या शेतकऱ्यांची २ कोटी ६२ लाख रुपयांची एफआरपी रक्कम आठ महिन्यांपासून थकीत असून, कामगारांचे पाच महिन्यांचे वेतनही प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कामगारांनी तक्रारी दाखल केल्यानंतर साखर आयुक्तांनी केंद्र सरकारच्या कायद्यानुसार आरआरसी नोटीस बजावली आहे. तसेच प्रादेशिक संचालक आणि विशेष लेखापरीक्षकांमार्फत कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढील कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे.

तीन वर्षे सुरळीत कारभार, नंतर निर्माण झाला पेच

‘नासाका’ कारखाना अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल एनर्जी लिमिटेडतर्फे २४ वर्षांच्या भाडेकरारावर चालवला जात आहे. २०१३-१४ पासून बंद असलेला हा कारखाना २०२२-२३ मध्ये पुन्हा सुरू झाल्यानंतर सुरुवातीची तीन वर्षे शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे आणि कामगारांना वेतन वेळेवर मिळत असल्याने समाधानाचे वातावरण होते.मात्र, २०२५-२६ च्या हंगामात कारखान्याचे संचालन खासगी कंपनीकडे गेल्यानंतर परिस्थिती बदलल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी, गोडसे यांची भूमिका

थकीत एफआरपीसाठी अनेक शेतकऱ्यांनी पुण्यातील संबंधित कंपनीकडे पाठपुरावा केला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी हा हंगाम आपल्या नियंत्रणाखाली नसल्याची भूमिका घेतल्याचे कारखान्याला ऊस पुरविणारे काही शेतकरी सांगत आहेत. भरत मुरकुटे, निवृत्ती गारे आणि सुदाम सानप यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रारी दाखल केल्याचेही समजते.

निफाडमधील ऊस उत्पादकांचेही पेमेंट रखडले

निफाड परिसरातून आलेल्या ३० ते ३५ हजार मेट्रिक टन उसाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रश्नावर सुरुवातीला काही लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली होती; मात्र सध्या त्यांच्याकडूनही ठोस हालचाल दिसत नसल्याची भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. थकीत एफआरपी, कामगारांचे वेतन आणि सुरू असलेली चौकशी यामुळे ‘नासाका’च्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here