नाशिक : चार वर्षांपूर्वी बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) पुन्हा सुरू झाला; मात्र आज तो पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहे. कुणी काय केले, यापेक्षा आता पुढे काय करायचे, हे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले. कारखाना कार्यस्थळावर शेतकरी व कामगारांतर्फे आयोजित मेळाव्यात खासदार वाजे अध्यक्षस्थानी होते. कारखाना पुन्हा सुरू करून शेतकरी, कामगार तसेच विविध पुरवठादारांची थकीत देणी मिळवून देण्यासाठी राजकारणविरहित कृती समिती स्थापन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कैफियत मांडण्यात येईल. या लढ्यात आपण स्वतः पुढाकार घेऊ, अशी ग्वाही खासदार वाजे यांनी दिली.
नाशिक साखर कारखान्याकडील गेल्या गळीत हंगाम २०२५-२६ मधील शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे वेतन, विविध पुरवठादारांची देणी थकीत आहेत. कारखान्याचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेडचे पदाधिकारी अथवा अधिकारी कारखान्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आगामी २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. याबाबत खासदार वाजे म्हणाले, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बंद पडलेला कारखाना सुरू करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीन वर्षांनंतर त्यांच्याकडूनही कारखाना काढून घेण्यात आला. यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. यावेळी बाबूराव मोजाड, शिवसेना जिल्हा समन्वयक जगनराव आगळे, कचरू गंधास, कैलास टिळे, कचरू कळमकर, तानाजी गायधनी, पंडित आवारे, सुनील गायधनी यांनी मनोगत व्यक्त केले.


















