नाशिक : एकेकाळी साखर उद्योग आणि ऊस उत्पादक तालुका म्हणून ज्या निफाड तालुक्याची राज्यभर ओळख होती. त्या तालुक्यात अल्प प्रमाणात उसाची लागवड केली जाते. परिणामी ऊस उत्पादन अत्यल्प प्रमाणात होत असल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सध्या रसवंती उद्योगाला ऊस मिळत नसल्याने उसाला दुप्पट दर मिळत आहे. रसवंती उद्योगामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
पाणीदार निफाड तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली जात होती. मोठ्या, प्रमाणात ऊस उत्पादन व्हायचे. निफाड व रानवड सहकारी साखर कारखानदारीतून हजारो मेट्रिक टन साखर उत्पादनाची, निर्मिती केली जात होती. मात्र, आता अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असल्याने ऊस उत्पादन घटले आहे.उसाला साखर कारखाना प्रती टन २,५०० ते २,७०० रुपये इतका भाव देतात. त्यात शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट वेळेत मिळेलच याची खात्री नसते. याउलट रसवंतीसाठी ऊस खरेदी करणारा व्यापारी प्रती टन ४,५०० ते ५,००० रुपये इतका भाव मोजतात. शिवाय उसाचे पेमेंट देखील रोख स्वरूपात मिळते. कारखाना ऊस तोडणीला १५ ते १८ महिने पूर्ण होतात, तरी ऊस तोडणी करत नाही. तर रसवंतीची उस तोडणी अगदी १० ते १२ महिन्यांत अगदी वेळेवर होते.


















