नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्यातर्फे निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निफाड, चांदोरी, चितेगाव, वहेदारणा व मांजरगाव येथे ऊस उत्पादक शेतकरी हितगुज व ऊस विकास सभा घेण्यात आल्या. कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस लागवडीचे नियोजन करण्याचे आवाहन केले. कारखान्याची गाळप क्षमता वाढली असल्याने आता मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करून कादवा कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले. या सभांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असे शेट्ये यांनी सांगितले.
अध्यक्ष शेट्ये म्हणाले की, कादवा कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून, निफाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊस मिळावा, ही अपेक्षा आहे. वेळेवर तोडणीसाठी मजूर, वाहतुकीचे योग्य नियोजन याला प्राधान्य देण्यात येईल. जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कायम राहील. दरम्यान, कारखान्याच्यावतीने उसाचे वजन झाल्यानंतर संबंधित ऊस उत्पादकाला एसएमएसद्वारे वजनाची माहिती देण्यात येते. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम राखल्याने गेटकेन क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्येही कादवा कारखान्यास ऊस देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. या सभांना कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी ऊस वाहतुकीवेळी अडचणी आल्यास कारखान्याचे शेतकी अधिकारी, ऊस विकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.


















