नाशिक : यंदा दुष्काळी परिस्थिती आणि अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याची कमतरता, ऊस उत्पादनातील घट, वाढलेला मजुरी खर्च, खते, औषधे आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमती यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ४,२०० रुपये ऊस दर देत आहेत. त्यामुळे द्वारकाधीश साखर कारखान्यानेही ३,५०१ रुपये ऊस दर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झााले आहे. त्यातही या मागणीवर भर दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून ४२०० रुपये दराची मागणी लावून धरत कारखानदारांशी संघर्ष केला. या घडामोडींचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. कसमादे परिसरातही ऊसदरवाढीची मागणी जोर धरत आहे. याबाबत यंदाच्या ऊसदरवाढीच्या आंदोलनात कलात्मक शैलीतून सहभाग नोंदवित मोरेनगर येथील शेतकरी, व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अपेक्षा मांडत द्वारकाधीश कारखान्याच्या संचालकांकडे पहिली उचल किमान ३५०१ रुपये जाहीर करण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी मांडली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून किमान ३५०१ रुपये पहिली उचल जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


















