सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ साठीच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात झाला. कोंडिबा चौगुले व संचालक अनिता चौगुले यांच्या हस्ते विधिवत होम व पूजा झाली. कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व सुनीता नाईक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. केंद्र सरकारने साखरेसह इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची मागणी अध्यक्ष नाईक यांनी केली.
अध्यक्ष नाईक म्हणाले की, केंद्र सरकारने अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी गतिमान उपाययोजना राबविण्याची गरज आहे. साखरेबरोबरच इथेनॉलच्या किमतीत वाढ करून हे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. त्याला केंद्र सरकारचे अनिश्चित धोरण जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांत साखरेच्या किमतीत अचानक झालेली वाढ व घसरण यामुळे उद्योगापुढील अडचणी वाढल्या आहेत. उद्योगाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत वाढ करून दर स्थिर ठेवणे गरजेचे आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यास अडचणी आल्या. यावर्षी तोडणी-वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली आहे. गाळपाचे नेटके नियोजन केले असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले.


















