सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाची ७० वी वार्षिक सभा सोमवारी मुंबई येथे झाली. सभेस साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष प्रताप ओव्हाळ, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश साळुंके, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ व इतर मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेस अकलुजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्रतिनिधी म्हणून स्वरूपाराणी मोहिते-पाटील या उपस्थित होत्या. त्यांनी आयत्या वेळच्या विषयात ऊसाची एफआरपी व साखर विक्रीची किंमत (एमएसपी) लिंक करणे गरजेचे आहे. त्यामुळे जसा उसाचा दर वाढेल, तशी साखरेची किंमत देखील वाढेल, असा मुद्दा उपस्थित केला.
स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की, उसाची एफआरपी व साखरेची एमएसपी याचे लिंकिंग करण्याची गरज आहे. त्याशिवाय जे शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना ऊस देतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन एक हजाराचे अनुदान थेट जमा करावे. ऊस आणि साखर यांच्या दराचे लिकिंग गरजेचे आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आधार मिळेल. सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ऊसाचे एकरी उत्पादन घटणार असून सहकारी साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिटन अनुदान द्यावे, अशी यावेळी करण्यात आली. साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी या मागणीची दखल घेऊन तसा ठराव करून शासनाकडे पाठवण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा ऊसदर मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.


















