लातूर : किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना यंदाच्या गाळप हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून तयारी करत आहे. कारखान्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील विविध १० विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत व्यवस्थापन समितीचा वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल, आर्थिक पत्रके तसेच २०२६-२७च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. याशिवाय कारखान्याचे आधुनिकीकरण, कार्यक्षेत्र विस्तार, भागभांडवल वाढ आणि आगामी गाळप हंगामाचे नियोजन याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
निळकंठेश्वर कारखान्याची गाळप क्षमता पूर्वीच्या १,२५० मेट्रिक टन प्रतिदिनवरून आता २,५०० मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात आली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असून, त्यापैकी सुमारे ८५ टक्के आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली. यंदाच्या गाळपासाठी दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऊस तोडणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २२ हार्वेस्टर, ५० बैलगाड्या तसेच अन्य वाहतूक साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
६१ गावांचा कार्यक्षेत्रात समावेश
औसा आणि निलंगा तालुक्यांतील लगतच्या ६१ गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यास सभेने मंजुरी दिली. तसेच कारखान्याचे अधिकृत भागभांडवल ५२.५० कोटी रुपयांवरून ६० कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आली. परतफेडीच्या अग्रहक्काच्या भागांची संख्या १० हजारांवरून १५ हजार करण्यासही सभेने मंजुरी दिली. त्यानुसार संबंधित पोटनियमांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ‘एनसीडीसी’च्या कर्जाच्या अटींनुसार विशेष लेखापरीक्षकांमार्फत वैधानिक लेखापरीक्षण करण्यास तसेच ई-ऑक्शनद्वारे करण्यात आलेल्या स्क्रॅप विक्रीच्या कार्यवाहीस कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. सभेस प्रविण फडणीस, समृत जाधव, सुभाषराव जाधव, वैधानिक लेखापरीक्षक व्ही. व्ही. डोके, आकुसकर तसेच भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता आदी उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्रासाठी १२ एकर जमीन देणार
किल्लारी येथील कारखाना परिसरात कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून केंद्राला मंजुरी मिळाल्यास कारखान्याकडून १२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक आणि शास्त्रीय शेतीपद्धती, सुधारित बियाणे, पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, पशुपालन, कृषी प्रक्रिया तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.


















