नवी दिल्ली : देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वेगाने वाढली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १६ फेब्रुवारी पर्यंत, एकूण थकबाकी अंदाजे १६,०८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय आहे. अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना एकूण ७९,८१८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते, त्यापैकी ६३,७३१ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. अंदाजे १६,०८७ कोटी रुपये थकीत आहेत. संसदीय समितीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक पटींनी थकबाकी वाढली आहे. सरकारने पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांची संपूर्ण थकबाकी द्यावी, अन्यथा त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
देशभरातील शेतकरी संघटनांनी तातडीने सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी समान कालावधीत थकबाकी ४९७ कोटी रुपये होती. तर २०२३-२४ मध्ये ती केवळ ३४ कोटी रुपये होती. उत्तर प्रदेशमध्ये थकीत रक्कम ३,२८७ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे तर महाराष्ट्रामध्ये ती ४,२५२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक थकीत रक्कम आहे. गुजरातमध्ये ही रक्कम २५ कोटी रुपयांवरून १,४०२ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणामध्येही कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. तामिळनाडूमध्ये २०३ कोटी रुपये, बिहारमध्ये २१२ कोटी रुपये, हरियाणामध्ये ३७३ कोटी रुपये आणि पंजाबमध्ये ५३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. देशात साखरेचे उत्पादन दरवर्षी आवश्यकतेपेक्षा जास्त होते. यामुळे कारखान्यांमध्ये साठा होतो आणि निधीची कमतरता भासते. यामुळेच शेतकऱ्यांना विलंब होत आहे.


















