परभणी : साखर कारखाना हा शेतकरी, कामगार आणि परिसराच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. श्री तुळजाभवानी शुगर प्रा. लि. कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासोबतच कामगारांच्या कष्टांना योग्य सन्मान देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आधुनिकीकरणानंतर सुरू झालेल्या या गळीत हंगामात कारखान्याने सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी देण्यात आली. आडगाव-दराडे येथील श्री तुळजाभवानी शुगर प्रा. लि. कारखान्याचा यंदाचा गळीत हंगामाचा शुभारंभ व मोळीपूजन सोहळा चेअरमन भावनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
आधुनिकीकरणानंतरच्या या गळीत हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली असून, सक्षम तोडणी व वाहतूक व्यवस्था आणि अद्ययावत मशिनरीच्या माध्यमातून सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी मीनाताई बोर्डीकर, सचिन मुंगसे पाटील, सचिन गोरे यांची विशेष उपस्थिती होती. कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक भारद्वाज, जनरल मॅनेजर विजय मते, वर्क्स मॅनेजर टोकलवाड, चीफ केमिस्ट कटियार, मुख्य शेतकी अधिकारी पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















