परभणी : गोदाकाठ ऑरगॅनिक ॲग्रो इंडस्ट्रीजने ऊस बिले थकविली; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी : पाथरी तालुक्यातील जवळा झुटा येथील गोदाकाठ ऑरगॅनिक ॲग्रो इंडस्ट्रीज या ऊस कारखान्याकडून गतवर्षी गाळपासाठी घेतलेल्या उसाचे देयक अद्याप न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना थकीत बिल तातडीने अदा करावे; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गोदाकाठ ऑरगॅनिक ॲग्रो इंडस्ट्रीज कारखान्याने १ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत गाळपासाठी दिलेल्या उसाचे देयक अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नियमानुसार ऊस गाळपानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिलाची रक्कम अदा करणे बंधनकारक असतानाही संबंधित कारखान्याकडून पेमेंट करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन थकीत रक्कम देण्याची मागणी केली होती. त्यावेळी २१ मेपर्यंत सर्व थकीत देयके अदा करण्यात येतील, असे लेखी आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते. या पत्रावर कारखान्याच्या सहा संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. १ जूनपर्यंत थकीत रक्कम अदा न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर महादेव घांडगे, विष्णू घाडगे, आनंद घाडगे, तुळशीराम कव्हाळे, बालासाहेब घाडगे, अंकुश घाडगे, कोंडीराम घाडगे, तसेच दिनेश घाडगे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here