परभणी : पावसाळी हवामानामुळे ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास ऊसाच्या उत्पादनात ३१ टक्क्यांपर्यंत, तर साखर उताऱ्यात दोन ते तीन टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिला आहे. केंद्रातील तज्ज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. जी. डी. गडदे, एम. बी. मांडगे यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांना विविध उपाय सूचवले आहेत. यात पिकाचा फेरपालट करा, खोडवा टाळणे, नत्राचा अतिवापर करू नये आणि तण व पर्यायी पिके नष्ट करावीत असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा पिकाचे निरीक्षण करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
याबाबत कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, सध्याचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे किडीची संख्या वाढत आहे. या किडीची पिल्ले व प्रौढ ऊसाच्या पानातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी, निस्तेज होतात. किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढून अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते. किडीला रोखण्यासाठी पाच टक्के मेलॅनोल्युका निंबोळी अर्क फवारणी, मेटारायझियम अॅनिसोप्ली ४० ग्रॅम/१० लिटर पाणी, इपिरिकॅनिया मित्रकीटकांचे संवर्धन करावे. अंडीपुंज असलेली पाने नष्ट करणे, प्रति पाच एकरला एक प्रकाश सापळा लावावा. याशिवाय, क्लोरोपायरीफॉस २० टक्के-६०० मिली/ एकर फवारणी करावी. फवारणी करताना इतर औषधे किंवा खते मिसळू नयेत अशी सूचना वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने केली आहे.


















