परभणी : जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२५-२६ मध्ये केवळ २,५०० रुपये प्रतिटन दर दिला. शेतकऱ्यांना आणखी ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले. ही मागणी तातडीने मान्य करून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला नाही, तर संबंधित चारही साखर कारखान्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा केवळ कारखान्यांना न होता ऊस उत्पादकांनाही मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील ६७शुगर-गंगाखेड, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अमडापूर, श्री तुळजाभवानी शुगर-सेलू आणि २१ शुगर युनिट ३-शिवणी या चार साखर कारखान्यांनी गेल्या ऊस हंगामात ऊस उत्पादकांना २,५०० रुपये प्रतिटन दर दिला आहे. सध्या साखरेच्या दरात वाढ झाली असून, त्याचा योग्य लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चारही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिटन दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीवर जिल्हा प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















