उसाला प्रतिटन ५ हजारांची पहिली उचल द्या, अन्यथा चक्काजाम! : रयत क्रांती संघटनेचा साखर कारखानदारांना इशारा

सोलापूर : चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शुक्रवारी श्रीपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन आणि आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संघटनेने दिला.

शेतीसाठी लागणारी खते, कीटकनाशके, मजुरी, पाणी आणि वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नैसर्गिक संकटे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि साखर कारखानदारांनी प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel

रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बाळासाहेब बिडवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बिडवे म्हणाले की, ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी चालू हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल द्यावी.

साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांचा विचार करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांचाही विचार होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना उसाचा रास्त दर मिळाला नाही, तर त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढतील. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने वेळकाढूपणा न करता पहिल्या उचलीबाबत तातडीने निर्णय घ्यावा. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही बिडवे यांनी दिला.या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, उदयसिंह माने-देशमुख, कमलाकर माने-देशमुख, प्रा. नरेंद्र भोसले, बाळासाहेब धाईजे, गोपाळकाका घार्गे, सतीश कुलाळ, मदनसिंह जाधव, वीरेंद्र पाटील आणि सयाजी गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here