कोल्हापूर: देशातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत क्रांतिकारक पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार, साखर उद्योगाचा कल आता केवळ साखरेपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गेल्या तब्बल सहा दशकांपासून, म्हणजेच १९६६ पासून लागू असलेला जुना ‘ऊस नियंत्रण आदेश’ रद्द करून त्याजागी अधिक आधुनिक आणि शेतकरीभिमुख ‘ऊस नियंत्रण आदेश २०२६’ लागू करण्याची तयारी केली आहे. नव्या धोरणात इथेनॉलला साखरेइतकाच अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. उसाचा रस, सिरप आणि मळी यांचा समावेश या कक्षेत करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखाने आता केवळ साखर उत्पादक न राहता ‘ऊर्जा केंद्र’ म्हणून नावारूपास येतील. कारखान्यांचा महसूल वाढल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्याच्या स्वरूपात होणार आहे. नव्या कायद्यानुसार उसाची ही थकबाकी आता ‘भूमी महसूल थकबाकी’ म्हणून गणली जाईल.
साखर उद्योगातील बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. जुना कायदा आजच्या काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी अपुरा पडत होता. नव्या कायद्यामुळे साखर कारखानदारीत मोठी पारदर्शकता येणार असून, वर्षानुवर्षे थकबाकीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा आधार मिळणार आहे. नवा आदेश लागू झाल्यामुळे साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यातील व्यावसायिक संबंध अधिक स्पष्ट आणि शिस्तबद्ध होतील. या प्रस्तावित मसुद्यावर केंद्र सरकारने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या असून, त्यासाठी २० मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर नव्या कायद्याची अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल. नव्या नियमानुसार, शेतकऱ्याने कारखान्याला ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याला एफआरपीप्रमाणे पेमेंट करणे कारखान्याला बंधनकारक असेल. कारखान्याने मुदतीत पैसे दिले नाहीत, तर त्यांना वार्षिक १५ टक्के व्याज आकारले जाईल. थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.


















