राज्यात साखर कारखान्यांतील वजन काटे तपासणीवेळी शेतकरी प्रतिनिधी आवश्यक – साखर आयुक्त

पुणे : आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून साखर कारखान्यांच्या वजन काटे तपासणीच्या कार्यपद्धतीबाबत सूचना केल्या आहेत. कारखान्यांना ऊस पुरवठा करताना तांत्रिक हेराफेरी केली जाते. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजन काट्यांचे कॅलिब्रेशन सील करावे, असे आदेश साखर आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ऊस गाळप हंगाम २०२६-२७ लवकरच सुरू होईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय अथवा जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करावी. पथकामध्ये महसूल, पोलिस, वैधमापन शास्त्र विभाग, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, प्रादेशिक साखर सहसंचालक तसेच शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या सूचनांनुसार, भरारी पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करावीत, भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेट देत वजनकाट्याची तपासणी करावी, शेतकऱ्यांना उसाच्या वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते की नाही, याची खात्री संबंधित पथकाने करावी, काट्यावर वजनात गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेला किंवा पोलिसांना मिळताच वजनकाट्याची तपासणी व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वैधमापन अधिकाऱ्यांनी वजनकाट्याची तपासणी करावी. यावेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घ्यावे. कॅलिब्रेशन होताच ते प्रतिनिधींसमक्ष सील करावेत’ अशा सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत. भरारी पथकांना वाहन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असेही साखर आयुक्तालयाने सूचित केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here