पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील ऊस संशोधन केंद्रात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले परिसरातील दिडशे महिला शेतकऱ्यांनी शनिवारी कृषी विभागाच्या पुढाकाराने भेट दिली. याप्रसंगी ‘आपत्कालीन परिस्थितीत ऊस पिकाचे नियोजन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे होते. यावेळी शिवार फेरीचेही आयोजन केले. याप्रसंगी अजित विधाते यांनी उसाचे नवीन वाण, मूलभूत बेणे प्लॉट याची माहिती दिली.
राज्यभरातून आलेल्या दीडशेपेक्षा अधिक महिलांना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्यावतीने ऊस व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तग धरणाऱ्या ऊस संशोधन केंद्राच्या नवीन वाणांची माहिती संशोधक सुरेश उबाळे यांनी दिली. बदलत्या हवामानामुळे उसावर पडणाऱ्या कीड व रोगांचे रासायनिक व जैविक पद्धतीने नियंत्रण कसे करावे, यावर कीटशास्त्रज्ञ डॉ. सूरज नलावडे यांनी मार्गदर्शन केले. वरीष्ठ संशोधक सहायक डॉ. दत्तात्रेय थोरवे यांनी ‘सुपरकेन नर्सरी’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस रोपांची निर्मिती आणि लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून दिले.


















