पुणे : भीमाशंकर कारखाना १० लाख टन ऊस गाळप करणार – दिलीप वळसे पाटील

पुणे : पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २७व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन सोमवारी (ता. १२) कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकारमंत्री दिपील वळसे-पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, प्रतापराव वळसे-पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. कारखाना चांगला चालतो हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये आपण निर्माण करू शकलो. त्याच बळावर चालू गळीत हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे ठेवले आहे, असे प्रतिपादन वळसे-पाटील यांनी या कार्यक्रमात केले. काही विघ्नसंतोषी लोक ओठावर एक पोटात एक ठेवून कारखान्याची बदनामी करत आहेत. मात्र, कारखाना कामगारांनाही २० टक्के दिवाळी बोनस दिला जाणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, यंदाच्या गळीत हंंगामात ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत गाळपाला येणाऱ्या उसाला एफआरपी प्रतिटन ३२७३ रुपयांप्रमाणे नियमित दर मिळेल. जानेवारीत गाळपाला येणाऱ्या उसाला ३२७३ रुपये अधिक १०० रुपये, फेब्रुवारीत ३२७३ रुपये अधिक २०० रुपये व मार्चमध्ये ३२७३ रुपये अधिक ३०० रुपये, अशा प्रकारे प्रतिटनाला दिले जातील. कारखान्याने मागील गाळप हंगामात उसाला प्रतिटन ३२७३ रुपये ‘एफआरपी’ प्रमाणे दिले आहेत. एकूण ३५०० रुपये दर दिला दिला. एफआरपी व भागविकास निधी ५० रुपये कपात वजा जाता उर्वरित १७७ रुपये टनाप्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. अध्यक्ष बेंडे यांनी सांगितले की, मागील वर्षी १०८ दिवस कारखाना चालवून १२५ टक्के कार्यक्षमतेने एकूण आठ लाख ८३ हजार टनाचे गाळप करून सरासरी ११.८९ टक्के साखर उताऱ्याने नऊ लाख २७ हजार १९७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. खोडवा उसाला प्रतिटन १०० रुपये अनुदान दिले आहे. यावेळी पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, आदिनाथ महाराज जुन्नरकर, नवनाथ महाराज माशेरे, संतदास महाराज मनसुख, अश्विनीताई महाराज टाव्हरे यांनी मनोगत व्यक्त केले. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप वळसे-पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here