पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण आठ लाख ८३ हजार ६९ उसासाठी ३,५०० रुपये प्रतिटन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. यापूर्वी अदा केलेला ऊस दर वजा जाता देय असलेली उर्वरित रक्कम १७७ रुपये प्रतिटनाप्रमाणे होणारी रक्कम जमा केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली. कारखान्याने दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले की, गेल्या हंगामात, सन २०२५-२६ मध्ये कारखान्याने गाळप केलेल्या आठ लाख ८३ हजार ६९ टन उसाला १७७ रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण रक्कम १५ कोटी ६३ लाख तीन हजार रुपये सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२६-२७मधील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देऊन पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे.


















