पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना स्थळावर वृक्षारोपणांतर्गत १० एकर क्षेत्रावर आंबा लागवडीचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्यावतीने २७ जुलैपासून कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीबाबत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. रविवारी, दि.०२ ऑगस्ट) पर्यंत हे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. ऊस उत्पादक शेतक-यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बेंडे यांनी केले.
यावेळी अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, आधुनिक ऊस शेती आणि स्वच्छता व वृक्षारोपण हा अजित पवार यांचा आवडता विषय होता. सध्याच्या परिस्थितीत वाढते प्रदुषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी कारखाना स्थळावर १० एकर क्षेत्रामध्ये आंबा लागवड करण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, प्रिया बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्षा सुषमा शिंदे, युवक अध्यक्ष वैभव उंडे, युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे, माणिक गावडे, ललित थिटे, दिनेश खेडकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, ब्रिजेश लोहोट, कैलास गाढवे, किरण शिंदे, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


















