पुणे : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिवाळीपूर्वी प्रतिटन १७७ रुपयांचा हप्ता अदा करण्याचा निर्णय घेेण्यात आला. त्यासह गळीत हंगामात ऊस दिलेल्या उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये अंतिम ऊसदर देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्याने हंगामात ८ लाख ८३ हजार टन उसाचे गाळप केले आहे. खोडवा उसासाठी कारखान्याने प्रतिटन १०० रुपये अनुदानही दिले आहे, असल्याची माहिती देण्यात आली.
साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बेंडे म्हणाले की, आगामी गळीत हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याने यापूर्वी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिटन ३२७३ रुपये अदा केले आहेत. आता अंतिम ऊसदर ३५०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यातून शिक्षणासाठी १० रुपये आणि भाग विकास निधीसाठी ४० रुपये, अशी ५० रुपयांची कपात करण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल. आगामी गळीत हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आगामी गळीत हंगामातही विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


















