पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ अधिकारी, कामगार मंडळींच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला. बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व मनीषा यादव या उभयतांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विश्वास जगताप, कमल पवार, शांताराम कापरे, महेश राणे, वर्क्स मॅनेजर नारायण नायकोडी, डिस्टिलरी मॅनेजर पुरुषोत्तम परकाळे, हिंदुराव सकुंडे, दीपक शेंडकर, उमेश मांडके उपस्थित होते. कारखान्याने नव्या हंगामात १४ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक त्या तोडणी-वाहतूक यंत्रणेशी करार पूर्ण झाले आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
नवा हंगाम मार्चपर्यंत १५० दिवस चालवण्याचा प्रयत्न आहे, हंगामात २५ हार्वेस्टर -ऊस तोडणी यंत्रांबाबतचे करार केले आहेत, असे सांगून कार्यकारी संचालक यादव म्हणाले की, कारखान्याने १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र ऊसतोड मजूर संघटनांनी दरवाढीसाठी संप पुकारला आहे, तसेच २० ऑक्टोबरला दसरा आहे. त्यामुळे दसऱ्यानंतरच हंगाम सुरू करणे शक्य होईल असे सध्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात सभासदांचा ३४ हजार एकर ऊस गळीत करून १२ लाख टन गाळप केले होते. यावर्षी सभासदांच्या कार्यक्षेत्रात ३७ हजार एकर ऊस उपलब्ध आहे. त्यातून साडेबारा लाख टन गाळप होईल आणि एक ते दीड लाख टन गेटकेन ऊस आणला जाईल. शेती खात्याकडून १०५० बैलगाडी, ६०० डम्पिंग ट्रॅक्टर, ३०० ट्रक ट्रॅक्टरचे करार झाले आहेत. रोज साडेबारा हजार टन ऊस पुरवठा होऊ शकेल. शेती अधिकारी बापूराव गायकवाड यांनी आभार मानले.


















