पुणे : आगामी ऊस गाळप हंगामासाठी छत्रपती कारखान्याकडून धोरण जाहीर, एक जुलैपासून लागवडीस परवानगी

पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२७-२८ च्या गाळप हंगामासाठी ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे. १ जुलै २०२६ ते ३१ मार्च २०२७ अखेर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना ऊस लागवड करता येणार आहे. तसेच २०२६-२७ च्या गळीत हंगामामध्ये तोडणी झालेल्या उसाचे खोडवे व निडवे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. आडसाली उसाच्या हंगामासाठी १ जुलै ते १५ जुलै २०२६ या कालावधीमध्ये को एम. ०२६५ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे. तसेच १६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत को. ८६०३२ व पीडीएन १५०१२ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी ही माहिती दिली. हंगामात को. ८६०३२, एम. एस. १०००१, पीडीएन १५०१२, को.एम. ०२६५ या जातीच्या उसाचा खोडवा राखण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याबाबत जाचक यांनी सांगितले की, ऊस लागण नोंदीचे कामकाजाचे संगणकीकरण केलेले असून सभासदांनी जेवढ्या क्षेत्रावर उसाची लागण केलेली आहे. तेवढ्याच क्षेत्राची कारखान्याकडे नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या क्षेत्राची पाहणीच्या वेळी लागवड नसल्यास सदरची लागण नोंद रद्द करण्यात येईल. १ जुलै व १६ जुलै २०२६ रोजी ऊस लागण केलेला नोंद फॉर्म त्या दिवशी सकाळी ७:०० ते ९:३० वाजेपर्यंत गाववार, विभागवार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले. पूर्व हंगामासाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीमध्ये को. ८६०३२, एम. एस. १०००१, पीडीएन १५०१२, फुले १५००६, फुले १३००७ या उसाच्या जातीची लागवड करता येणार आहे. तर सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीमध्ये को. ८६०३२, एम.एस. १०००१, पीडीएन १५०१२, फुले १३००७, फुले १५००६ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here