पुणे : दौंड शुगर लिमिटेडकडे आगामी हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी केली. आलेगाव (ता. दौंड) येथे कारखान्याच्या सन २०२६-२७ या १८व्या गळीत हंगामाचा शुभारंभ जय पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी तसेच तोडणी-वाहतूक यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे जय पवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखानदारीच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. संचालक वीऱधवल जगदाळे यांनी पावसाने ओढ दिल्याने शासनाने यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दौंड शुगरला ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहन केले. दुष्काळी परिस्थितीत गाळप लवकर सुरू केल्यास साखर उतारा कमी होण्याची शक्यता असली, तरी कारखाना १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कार्यकारी संचालक शहाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संदेश बेनके यांनी आभार मानले.


















