पुणे : नीरा-भीमा कारखान्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रायोगिक ऊस प्लॉट विकसित, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी

पुणे : पारंपरिक ऊस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दिशेने निरा-भीमा कारखान्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचा प्रायोगिक प्लॉट विकसित केला आहे. या प्लॉटची माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. प्लॉटच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग तपासला जात आहे. या प्रयोगातून मिळणारे निष्कर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरल्यास भविष्यात त्याचा व्यापक प्रमाणावर विस्तार करण्याची शक्यता आहे. निरा-भीमाने सुरू केलेला हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्याचा लाभ केवळ कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच नव्हे, तर राज्यातील अन्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही होऊ शकतो.

सहकाराच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची ही दिशा भविष्यात अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये अचूकता, कार्यक्षमता आणि उत्प उत्पादनक्षमता वाढविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी केवळ ऊस गाळप आणि साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता सभासद शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याची भूमिका बजावली पाहिजे. ऊस पिकाच्या वाढीचे बारकाईने निरीक्षण, पिकाच्या गरजेनुसार पाणी व खत व्यवस्थापन, रोग-किडींची संभाव्य लक्षणे वेळेत ओळखणे तसेच उपलब्ध संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा हा प्रयोग आहे. कारखान्याचा एआय आधारित ऊस प्लॉट हा पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील दुवा ठरण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here