पुणे : प्रतिटन साडेचार हजाराचा पहिला हप्ता देण्याची शेतकऱ्यांची मागणी, गुऱ्हाळघरावर सुमारे ३,५०० ते ३,८०० रुपये दर

पुणे : दौंड तालुक्यात यंदा अनेक भागांत पाणीटंचाईचे सावट असून, आगामी तीन महिन्यांत उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करून ऊस पीक अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. पिकासाठी मोठा खर्च केल्यानंतर योग्य दर मिळाला नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. गळीत हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच ऊसदराचा मुद्दा तापला आहे. वाढता उत्पादनखर्च आणि पाणीटंचाई लक्षात घेता यंदा किमान ४ हजार ५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये दर गुऱ्हाळघरावर मिळत असल्याचे सांगितले जात असून, उत्पादनखर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. अनेक शेतकरी संघटना उसाचा अंतिम दर वाढावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

तालुक्यातील दौंड शुगर्स, श्रीनाथ म्हस्कोबा, ओंकार ग्रुप यवत, निराणी ग्रुप संचालित भीमा-पाटस हे चार साखर कारखाने तालुक्यातील ऊस गाळप करणार आहेत. मात्र ऊस तोडणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच दराची घोषणा झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या ऊस गाळपाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कारखानदारांकडून किती दर मिळतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे. शेतकऱ्यांनीही ऊस गाळपासाठी देताना कारखाना किती दर देणार, पहिला हप्ता किती असणार आणि पुढील बिले कशी देणार, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. याविषयी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले की, साखर कारखानदारांनी योग्य दर जाहीर करण्याची गरज आहे. ऊस उत्पादनाचा वाढलेला खर्च, पाणीटंचाई या बाबींचा विचार करून उसाला किमान ४,००० ते ४,५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता जाहीर करावा अशी अपेक्षा आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here