पुणे : सध्या साखरेला किलोला सुमारे ७० तर गुळाला ५५ ते ६० रुपये बाजारभाव मिळत आहे. मात्र, गुऱ्हाळासाठी उसाला सुमारे ३ हजार ८०० रुपये दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुळाचा बाजारभाव वाढतो, मग उसाचा दर वाढण्यास अडचण काय ? असा सवाल रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील शेतकरी एल्गार मेळाव्यात करण्यात आला. गुऱ्हाळाला ऊस देऊ नका, एकजूट कायम ठेवा, बाजारभाव निश्चित होईपर्यंत गावातून ऊस बाहेर जाऊ देऊ नये अशी शेतकऱ्यांनी भूमिका मांडली. उत्पादन खर्चामध्ये मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गुऱ्हाळचालक रोहिदास इटनर यांनी चार हजार रुपये प्रतिटन दर देणे शक्य असल्याचे सांगितले. मात्र, काही गुऱ्हाळचालकांनी ऊसतोड बंद ठेवण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मेळाव्यात काही काळ दराच्या मुद्द्यावरून वातावरण तापले.
साखर आणि गुळाच्या बाजारभावात तेजी असताना ऊस उत्पादकांच्या पदरात मात्र कमी दर का असा सवाल उपस्थित करत रांजणगाव शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी आक्रमक भूमिका घेतली. एल्गार मेळाव्यास परिसरातील सुमारे ६०० शेतकरी उपस्थित होते. उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. पाच सप्टेंबरपर्यंत गुऱ्हाळाला ऊस न देण्याचा ठराव हात वर करून एकमताने मंजूर केला. शिरूर व दौंड तालुक्यातील गुऱ्हाळचालकांनी शेतकऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन दर निश्चित करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी उपसरपंच सुदाम रणदिवे यांनी ऊस दरातील तफावत दूर करण्याची मागणी केली. संपत रणदिवे व उमेश रणदिवे यांनी गुळाचा दर वाढत असेल तर त्याच प्रमाणात उसाचा दरही वाढला पाहिजे, अशी भूमिका मांडली. युवा शेतकरी आप्पासाहेब रणदिवे, संपत फराटे, पंकज रणदिवे, अजित रणदिवे यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल रणदिवे, संभाजी रणदिवे, सचिन रणदिवे, प्रवीण रणदिवे, अमोल काळभोर, बापूसाहेब राक्षे, तुषार जगताप यांच्यासह गुऱ्हाळ चालक व शेतकरी उपस्थित होते. तुकाराम शिंदे व प्रा. गोरक्षनाथ डुबे यांनी प्रास्ताविक केले.


















