पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने औरंगपूर (ता. जुन्नर) येथे शेतकरी मेळाव्यात एकरी १०० टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कारखाान्याचे तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण याांनी सुपरकेन रोपवाटिकेविषयी माहिती दिली. ‘एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी उसाचे दर्जेदार व सशक्त रोप हीच पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या घरी कमी खर्चात सुपर केन रोपवाटिका तयार करून ऊस लागवड करावी,’ असे आवाहन त्यांनी केले. सुपर केन रोपवाटिकेत तयार होणाऱ्या एका रोपाचा खर्च अवघा ७० पैसे इतका येतो, तर बाहेरून विकत घेतलेल्या रोपासाठी शेतकऱ्यांना सुमारे २ रुपये ७० पैसे खर्च करावा लागतो. त्यामुळे एकरी लागवडीत १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्चाची बचत होते असे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे अधिकारी संदीप मोरडे यांनी कारखान्याच्या विविध शेतकरी हिताच्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. शुगर केन डेव्हलपमेंट ग्रुपचे सुभाष मोरे यांनी हिरवळीच्या खताचे महत्त्व, पूर्वमशागतीचे नियोजन आणि ऊस लागवडीपूर्वी जमिनीची शास्त्रोक्त तयारी याविषयी मार्गदर्शन केले. रोपवाटिकेसाठी ९ ते १० महिन्यांचा सशक्त ऊस बेणे म्हणून निवडल्यास एकरी लागवडीसाठी केवळ २५ मुळ्या पुरेशा ठरतात. त्यामुळे बेण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. एक डोळ्याच्या टिपऱ्यांवर शिफारशीनुसार बेणे प्रक्रिया करून तयार केलेली रोपे अवघ्या २५ दिवसांत लागवडीसाठी सक्षम होतात, असे सांगण्यात आले. कारखान्याचे रुपेश डेरे यांनी सूत्रसंचालन केले, अशोक डुकरे यांनी आभार मानले. मेळाव्यास औरंगपूर परिसरातील गावांतील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


















