पुणे : यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उसाची वाढ व परिपक्वता कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरऐवजी १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करत गुरुवारी विविध शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केले. शरद जोशी विचार मंचाच्या छत्राखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जनार्दन पाटील, भगवान काटे, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, श्यामसुंदर जायगुडे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब पाटील, राजेंद्र लोंढे, राजू धुमाळ, वैभव कांबळे, रवींद्र मोरे, प्रल्हाद इंगोले, अभिजित पोटे, विश्वंभर बाबर, रामदास दोरगे, संभाजीराव चौगले, सदाशिव कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
आंदोलनाची दखल घेत साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी १४ ऑक्टोबरला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्त डॉ. कोलते यांची भेट घेऊन ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, साखर सहसंचालक प्रकाश अष्टेकर नारायण आघाव, महेश झेंडे आदी उपस्थित होते. आंदोलनावेळी जय शिवराय किसान संघटना अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, की डिसेंबर ते मार्च या कालावधीत साखर उतारा अधिक मिळतो. त्यामुळे कारखाने लवकर सुरू करणे चुकीचे आहे. ऊस वाहतुकीतील २५ कि.मी.ची अट रद्द करावी, अंतरानुसार वाहतूक दर निश्चित करावा, साखरेची एमएसपी ५५ रुपये करावी, साखरेचे दर घरगुती व औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र ठेवावेत, ऊस उत्पादकांना प्रत्यक्ष रिकव्हरीनुसार दर देण्याची पद्धत लागू करावी, अशा आमच्या मागण्या आहेत. ऊस उत्पादन खर्चातील वाढ, महागाई निर्देशांक आणि कुटुंबाच्या चरितार्थाचा खर्च विचारात घेऊन एफआरपीपेक्षा अधिक दर निश्चित करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


















