पुणे : प्रतिटन ४५०० पेक्षा अधिक ऊस दर न मिळाल्यास कांडेही तोडू न देण्याचा शेतकऱ्यंचा निर्धार

पुणे : गूळ आणि साखरेच्या वाढलेल्या दरांचा लाभ मिळावा यासाठी दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी एकवटला आहे. खामगाव, पारगावसह अनेक गावांमध्ये बैठका घेत शेतकऱ्यांनी प्रतिटन ४५०० ते ४७०० रुपये दराची मागणी केली असून, दर न दिल्यास ऊसतोड बंद करण्याचा थेट इशारा दिला आहे. बाजारात साखर आणि गुळाचा दर प्रचंड वाढला असताना शेतकऱ्यांची मात्र लूट सुरू असल्याची भावना निर्माण झाली आहे. गावागावांमध्ये शेतकऱ्यांनी आता प्रतिटन ४५०० ते ४७०० रुपये दराचा आकडा जाहीर करत कारखानदारांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत साखरेचा दर प्रति किलो ७२ वरून ५२ रुपयांपर्यंत, तर गुळाचा दर ६०वरून ५० रुपयांपर्यंत घसरला आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे ऊस दराचे गणित जुळवताना गुऱ्हाळ मालकांची डोकेदुखी वाढली असून, दर निश्चितीतील गुंता अधिकच वाढला आहे.

ऊस दरवाढीसाठी राहू बेट आणि जळगाव परिसरात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक ठिकाणी दर निश्चितीसाठी बैठका होत असल्या तरी गुऱ्हाळ चालक आणि मालक या बैठकींना अनुपस्थित राहत असल्याने अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, कोणत्याही क्षणी ऊसतोड बंद आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील गुऱ्हाळ मालक एकनाथ शेलार यांनी प्रति टन ४३०० रुपयांचा उच्चांकी दर जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. गुऱ्हाळ चालकांनी आमच्या मागणीचा विचार करून प्रति टन ४५०० रुपये दर त्वरित जाहीर करावा, अन्यथा पारगाव परिसरातील संपूर्ण ऊसतोड बंद ठेवली जाईल. आता आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा शेतकरी सर्जेराव जेधे आणि सयाजी ताकवणे यांनी दिला आहे. जोपर्यंत नवा दर मिळत नाही, तोपर्यंत ऊसतोड सुरू करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. पारगाव येथे ऊस दर निश्चितीसाठी ११ सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. तर राहू बेट परिसरात प्रति टन ४७०० रुपये दराची मागणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here