पुणे : गूळ निर्मितीत साखर व अन्य पदार्थांचा वापर करून भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी दौंड तालुक्यातील पाटस येथील अर्णव गूळ उद्योगावर छापा टाकला. तपासणीदरम्यान गुळाचे नमुने, तसेच उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या काही पदार्थांचे नमुने ताब्यात घेऊन सीलबंद करण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईत ७ हजार ९७९ किलो वजनाचा व ३ लाख ३५ हजार ११८ रुपये किमतीचा गूळ साठा सीलबंद करून जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर पाटस परिसरात गूळ भेसळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
अधिकाऱ्यांनी अर्णव गूळ उद्योगाचे मालक विठ्ठल वणवे यांच्याकडे गूळ व्यवसायासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती मिळाली. जप्त केलेल्या गूळ साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आदित्य जोशी यांच्या स्वाक्षरीने जप्तीचे लेबल लावले असून, त्यावर विक्रेता म्हणून विठ्ठल वणवे यांचीही स्वाक्षरी घेण्यात आली आहे. भेसळीच्या प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने साखर साठविण्याच्या ठिकाणांचाही शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


















