पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत गेल्या हंगामात गाळप झालेल्या सभासदांच्या उसाला प्रतिटन २०० रुपये दर जाहीर केला. आजच्या संकटकाळात राज्यातील शेतकऱ्यांचे हित जपणारा माळेगाव हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार यांनी केले. कारखान्याच्या सभागृहात चेअरमन सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी कांडे बिल देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. उपाध्यक्षा संगीता कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील, जेष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, जयपाल देवकाते, रतनकुमार भोसले, नितीनकुमार शेंडे, नितीन सातव, योगेश जगताप यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात १० लाख ८९ हजारपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून, शासनाने ठरवून दिलेल्या ३२६९ एफआरपीपेक्षा जादा ३३०० रुपये प्रति टन दर दिला आहे. सभासदांना लवकरच बॅकंत कांडे पेमेंट अदा केले जाईल. दरम्यान, कांडे पेमेंट मिळावे यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार व संचालक मंडळाने दखल घेऊन कांडे पेमेंट जाहीर केले. सर्व सभासदांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानतो असे नितीन तावरे यांनी सांगितले. दरम्यान जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या सभासदांना कोकणातून आणण्यात आलेल्या विविध वृक्षांचे वाटप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.


















