पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवर अवलंबून न राहता, घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून स्वस्त आणि प्रभावी खते, कृषी संजीवके, कीटकनाशके व बुरशीनाशके कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्यावतीने करण्यात आले. बुधवारी झालेल्या या कार्यशाळेत ‘कमी खर्चात ऊस उत्पादनवाढ’ या विषयावर कृषीतज्ज्ञ अंकुश पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने तांत्रिक माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च कमी करून नफ्यात वाढ करण्याचे नवे तंत्र गवसले असल्याची भावना ऊस उत्पादक सभासद अशोकदादा तावरे, नामदेव तांबे, राजाभाऊ तावरे यांनी बोलून दाखवली.
अंकुश पाटील यांनी वाढत्या महागाईच्या काळात शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे, ही काळाची गरज बनली आहे. हे लक्षात घेऊन मार्गदर्शन केले. याबाबत प्रा. एन. के. जगताप म्हणाले की, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व भासणारा तुटवडा या स्थितीत घरच्या घरी व कमी खर्चात मिश्र खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये व ह्युमिक अॅसिड तयार करण्याची पद्धत सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजून सांगण्याचे काम अंकुश पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनामुळे कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना निश्चितच फायदा होईल. कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे व संचालक नितीनकुमार शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी स्वागत केले. सुरेश काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक रतनकुमार भोसले यांनी आभार मानले.


















