पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा कार्यक्षेत्रातील गावागावांत राजकीय बैठका, गाठीभेटी आणि सभासदांशी संपर्क वाढला आहे. इच्छुक उमेदवार, विद्यमान संचालक तसेच विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी, दि. ५ रोजी सायंकाळी ४ वाजता होळ येथील सोमनाथ पॅलेस मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
गेल्यावेळी झालेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपविरुद्ध एकसंघ राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पॅनेलने या निवडणुकीत एकहाती विजय मिळविला होता; मात्र, त्यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती, ऊस उत्पादकांना मिळणारा दर, कारखान्याची कार्यक्षमता आणि सभासदांचे हित या मुद्द्यांवरही आगामी निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होणार की बहुरंगी लढत रंगणार, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.


















