पुणे : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यांचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अंशतः बदल आदेश पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी दिले आहेत. या कामी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडील दाखल अपिलातील आदेश, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेशान्वये साखर सहसंचालकांनी हे आदेश दिनांक १२ मे रोजी जारी केले आहेत. मुंबई उच्च आदेशानुसार भीमा कारखान्याच्या प्रशासक समितीच्या बदलाची पुनर्रचनेची प्रक्रिया दि.७ मेपासून एका आठवडयाच्या आत पूर्ण करण्यात यावी आणि त्यानंतर पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीत कारखान्याच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिले. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही व व्यवस्था न्यायालयाच्या दिलेल्या कालावधीत करावी, असेही साखर सहसंचालकांनी आदेशात पुढे म्हटले आहे.
भीमा कारखान्याच्या सन २०१९ २०२४ या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी अंदाजित निवडणूक निधी ६० लाख ११ हजार ४७५ रुपये भरणा करावा, अशी मागणी कारखान्यांकडून वेळोवेळी करण्यात आली. मात्र, केवळ २० लाख रुपये जमा केले. दरम्यान, समितीच्या रचनेत दोष निर्माण झालेला आहे व संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये पोकळी निर्माण झालेली असल्याचे नमूद करीत पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक गायकवाड यांनी दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी तीनसदस्यीय समिती नियुक्त केली.
या आदेशाला शेतकरी तुकाराम ताकवणे-पारगाव यांनी सहकारमंत्र्यांकडे आव्हान दिले असता, त्यांनी दिनांक ७ मे रोजी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालकांचा आदेश रद्द केला. मात्र, याही आदेशाला वसंतराव सांळुखे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यांमध्ये सुरू करण्याचा आदेश दिला. त्याला अनुसरुनच भीमा कारखान्याच्या प्रशासकपदी प्रकाश जगताप यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान, जगताप यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.


















