पुणे : नीरा-भीमा कारखान्यावर ऊस पिकाबाबत ‘एआय’ तंत्रज्ञान परिसंवादाचे आयोजन

पुणे : निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सोमवारी (दि. २७) दुपारी १.३० वाजता शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे ‘ऊस पीक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान’ या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी ही माहिती दिली. बदलत्या काळात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, उत्पादन वाढ, साखर उतारा सुधारणा, मृदा व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऊस शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि स्पर्धात्मक करण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग तसेच विज्ञान केंद्र, बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग प्रमुख तुषार जाधव हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी निरा-भिमा सहकारी कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) चे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील. परिसंवादात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस शेतीतील प्रत्यक्ष वापर आणि त्याचे आर्थिक फायदे याविषयी मार्गदर्शन केले जाईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या ऊस हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. परिसंवादाचा लाभ कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा पाटील, उपाध्यक्ष घोगरे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here