पुणे : शेतकऱ्यांनी सुपर केन रोपवाटिका तयार करण्याचे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे आवाहन

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने औरंगपूर (ता. जुन्नर) येथे शेतकऱ्यांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे तज्ज्ञ संचालक विकास चव्हाण यांनी शेतकऱ्यांना सुपरकेन रोपवाटिकेविषयी मार्गदर्शन केले. एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्यासाठी उसाचे दर्जेदार व सशक्त रोप हीच पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने घरच्या घरी कमी खर्चात सुपर केन रोपवाटिका तयार करून ऊस लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. सुपर केन रोपवाटिकेत तयार होणाऱ्या एका रोपाचा खर्च अवघा ७० पैसे इतका येतो, तर बाहेरून विकत घेतलेल्या रोपासाठी शेतकऱ्यांना सुमारे २ रुपये ७० पैसे खर्च करावा लागतो. त्यामुळे एकरी लागवडीत १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्चाची बचत होते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते. घरी तयार केलेली सशक्त रोपे जमिनीत लवकर स्थिरावतात. असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री विघ्नहर कारखान्याचे अधिकारी संदीप मोरडे यांनी शेतकरी योजना व उपक्रमांची माहिती दिली. शुगर केन डेव्हलपमेंट ग्रुपचे सुभाष मोरे यांनी हिरवळीच्या खताचे महत्त्व, आणि ऊस लागवडीपूर्वी जमिनीची शास्त्रोक्त तयारी याविषयी मार्गदर्शन केले. सुपरकेन नर्सरीत प्लास्टिक ट्रे अथवा कोकोपीटचा वापर न करता सहज व कमी खर्चात गादी वाफ्यावर रोपे कशी तयार केली जातात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. रोपवाटिकेसाठी ९ ते १० महिन्यांचा सशक्त ऊस बेणे म्हणून निवडल्यास एकरी लागवडीसाठी केवळ २५ मुळ्या पुरेशा ठरतात. त्यामुळे बेण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. एक डोळ्याच्या टिपऱ्यांवर शिफारशीनुसार बेणे प्रक्रिया करून तयार केलेली रोपे अवघ्या २५ दिवसांत लागवडीसाठी सक्षम होतात, असे सांगण्यात आले. कारखान्याचे रुपेश डेरे यांनी सूत्रसंचालन केले, अशोक डुकरे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here