पुणे : माळेगाव कारखान्यासोबतच्या ऊसदर स्पर्धेत सोमेश्वर कारखाना ठरतोय वरचढ !

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाना यांच्यातील ऊसदराची स्पर्धा नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याच्या बाबतीत माळेगाव कारखाना नेहमीच वरचढ राहिला आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत सोमेश्वर कारखान्याने माळेगावसमोर मोठे आव्हान उभे करीत ऊसदराबाबत जोरदार टक्कर दिली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या ऊसदराच्या तुलनेत माळेगावच्या अंतिम ऊसदराकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर कारखान्याने सभासदांना नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ३ हजार ८०० रुपये तसेच फेब्रुवारीतील उसासाठी ३ हजार २०० रुपये, तर मार्च महिन्यात तुटलेल्या उसासाठी ४ हजार रुपये प्रतिटन ऊसदर अनुदानासह दिला आहे. माळेगाव कारखान्याने प्रतिटन ३ हजार ३०० रुपये व कांडेबिलाचे २०० रुपये असे एकूण प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दिले आहेत. या पार्श्वभूमीवर माळेगावच्या भूमिकेकडे सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

सोमेश्वर कारखान्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्लॅट आणि वीजनिर्मिती या उपपदार्थांच्या प्रकल्पांमधून नफा मिळवण्यावर सातत्याने भर दिला आहे. दुसरीकडे माळेगाव कारखान्याकडेही हे प्रकल्प आहेत. परंतु त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि नफ्याचा योग्य ताळमेळ घालून तो दर ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात माळेगावचे व्यवस्थापन काहीसे मागे पडल्याचे दिसते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक वारसा मोठा आहे. मात्र, बदलत्या व्यावसायिक युगात केवळ जुन्या नावावर गाडा चालत नाही. उत्पादन खर्च नियंत्रण, उपपदार्थाचे अचूक व्यवस्थापन आणि पारदर्शक आर्थिक धोरण या त्रिसूत्रीवर सोमेश्वरने मारलेली बाजी ही माळेगावच्या आत्मपरीक्षणाची वेळ आणणारी ठरली आहे. माळेगावने जर आपल्या प्रशासकीय व आर्थिक नियोजनात तातडीने सुधारणा केली नाहीं, तर निरा खोऱ्यातील ऊसदराच्या स्पधेर्त माळेगावला आपले वर्षानुवर्षे टिकून असलेले अग्रस्थान कायम राखणे कठीण जाणार आहे.

‘सोमेश्वर’कडून ‘एफआरपी’पेक्षा ५१५ रुपये अधिक

सोमेश्वर कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन ५१५ रुपये अधिकचा ऊसदर दिला आहे. तर माळेगाव साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा आत्तापर्यंत २३१ रुपये अधिकचे दिले आहेत. त्यामुळे माळेगाव आता अंतिम ऊसदर किती देणार? याकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखाना यांच्यातील चुस्स नेहमीच गाजली आहे. कधी काळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याच्या बाबतीत माळेगाव नेहमीच अग्रेसर होता. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत सोमेश्वरचे आर्थिक व व्यवस्थापकीय गणित अधिक सरस ठरत असल्याचे दिसते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here