पुणे : अनुदानासह राज्यात सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याने सन २०२५- २६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रति मे. टन ४,००० रुपये अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही माहिती दिली. मागील गाळप हंगामात कारखान्याने सुमारे १२ लाख १८ हजार मे. टन उसाचे गाळप केले. सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखत सुमारे १५ लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले की, कारखान्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात तुटलेल्या उसासाठी प्रति मे. टन ३,८०० रुपये, फेब्रुवारीतील उसासाठी ३,९०० रुपये, तर मार्चमधील उसासाठी ४ हजार रुपये असा दर जाहीर केला होता. आता अनुदानाचा समावेश करून प्रतिटन ४ हजार रुपयांचा अंतिम दर निश्चित करण्यात आला आहे. कारखान्याने को-जनरेशन प्रकल्पातून वीजनिर्मिती व वीजविक्री, डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉलचे उत्पादन घेतले. त्यामुळे यंदाही सभासदांच्या खात्यावर अतिरिक्त रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या हंगामासाठी कार्यक्षेत्रात सुमारे ३९ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. आगामी हंगामात अंदाजे १२ ते १२.५० लाख मे. टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत आगामी हंगामातही सर्वोच्च ऊसदर देण्याचा निर्धार कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला.


















