पुणे: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गाळप हंगामासाठी आडसाली लागवड एक जुलैपासून, पूर्व हंगामी लागवड एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कारखान्याने सन २०२६-२७ साठी ऊस लागवड धोरण जाहीर केले आहे. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्गदर्शनानुसार हे धोरण तयार करण्यात आले आहे. कारखान्याच्या नियोजनानुसार लागवड तारखेनुसार ऊसतोडणी कार्यक्रम राबविला जाणार आहे. ऊस उत्पादकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. ठिबक सिंचन, माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर आणि आधुनिक रोप लागवड तंत्र स्वीकारल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या सूचनांचे पालन करून वेळेत लागवड व नोंदणी करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले आहे. आडसाली हंगामात जुलै महिन्यात लागवड केलेल्या को-८६०३२, व्हीएसआय-८००५ आणि कोएम-०२६५ जातींच्या उसाला प्राधान्याने तोड मिळणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कारखान्याने सांगितले की, गळीत हंगामासाठी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू व खोडवा हंगामासाठी ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ३१ मार्चदरम्यान केल्या जाणाऱ्या रोप लागवडीची स्वतंत्र नोंद घेतली जाणार आहे. आडसाली हंगामासाठी को-८६०३२, व्हीएसआय-८००५, कोएम-०२६५ या ऊस जातींसाठी १ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान परवानगी देण्यात आली आहे. तसेच, पूर्व हंगामी लागवडीसाठी को-८६०३२, व्हीएसआय-८००५, कोएम-०२६५, फुले ऊस-१३००१, फुले ऊस-१५०१२ आणि व्हीएसआय-९०००१ या जातींसाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत लागवड करता येणार आहे. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत व्हीएसआय-९०००१, को-८६०३२, व्हीएसआय-८००५, व्हीएसआय-१८०५, फुले ऊस-१५०१२, फुले ऊस-१३००१ आणि कोएम-०२६५ या जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.


















