पुणे : सोमेश्वर साखर कारखान्यात पाच महिन्यात उच्चांकी १२ लाख ९८ हजार मे. टन ऊस गाळप

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या १४३ दिवसांत, म्हणजेच जवळपास पाच महिने अखंड सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामात उच्चांकी १२ लाख ९८ हजार टन ऊस गाळपाची नोंद केली. सोमवारी रात्री गव्हाणीत नारळ टाकून पारंपरिक पद्धतीने हंगामाची सांगता करण्यात आली. साखरेचा सरासरी उतारा, उपपदार्थ व एकूण साखर उत्पादनाबाबतची अंतिम आकडेवारी पुढील दोन दिवसांत जाहीर होणार आहे. सांगता समारंभाला ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक सुनील भगत, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, अधिकारी, ऊस तोडणी कामगार उपस्थित होते.

दरम्यान, हंगाम संपल्याच्या आनंदात ऊस तोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. हंगामात सर्वाधिक ऊसतोडणी करणाऱ्या बबन व जनाबाई भिलारे या पती-पत्नीने ६०० टन ऊसतोड करून प्रथम क्रमांक पटकावला. तर अनिल भोसले यांनी ५३३ टन व दिलीप भोसले यांनी ५२० टन ऊस तोडला. काही कामगारांनी आपल्या बैलांना गुलाल लावून कारखाना परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाला होता. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हंगामाची यशस्वी सांगता झाली असे सांगण्यात आले. हंगाम यशस्वी करण्यासाठी मुकादम सचिन माने, रघुनाथ चव्हाण, दिलीप भोसले, नाना भोसले आणि दादासो अर्जुन माने यांनी परिश्रम घेतले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here