पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकताच सभासदांना जानेवारीअखेर ३८००, फेब्रुवारीत ३९०० तर मार्चमध्ये ४००० रुपये प्रतिटन दर नुकताच जाहीर केला आहे. सोमेश्वरची १२ लाख ९८ हजार गाळपाच्या दराची सरासरी ३८५० रुपये होत आहे. तर माळेगाव कारखान्याने रविवारी सभासदांच्या ७,७५,००० टनांसाठी सरसकट ३६५० रुपये तर गेटकेन उसाला ३,१४,००० टन उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर जाहीर केला. ‘सोमेश्वर’ने सभासदांना प्रतिटन दीडशे ते दोनशे रुपये अधिक देऊन बाजी मारली आहे. आताच्या दिवाळीला ‘सोमेश्वर’कडून ६१ कोटी तर माळेगावकडून सुमारे १४ कोटींची अंतिम बिले मिळणार आहेत. कामगारांनाही चांगले बोनस मिळणार आहेत.
बारामती, पुरंदर, फलटण, खंडाळा तालुक्याच्या बाजारपेठांचेही दिवाळीच्या तोंडावर सोमेश्वर व माळेगाव या दोन्ही कारखान्यांच्या अंतिम बिलाकडे लक्ष असते. मर्यादित कार्यक्षेत्र, मोठी डिस्टिलरी-कारखाना यामुळे माळेगाव पुढे असायचा. ‘सोमेश्वर ‘नेही आवश्यक ते विस्तारीकरण केले. २०१७-१८ पासून कधी माळेगाव तर कधी ‘सोमेश्वर’ पुढे अशी शेतकरीहिताची स्पर्धा आहे. गेटकेनधारकांना मात्र दोन्ही कारखान्यांनी ३४०० रुपये प्रतिटन दर दिला आहे. ‘सोमेश्वर’ने ९६ हजार तर माळेगावने तीन लाख टन गेटकेन आणला होता. दिवाळीच्या तोंडावर ७५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामुळे बाजारपेठांनाही मोठा आधार मिळणार आहे. जादा गाळपामुळे ‘सोमेश्वर’ची एकूण ऊसबिले ४९५ कोटींची तर ‘माळेगाव’ची ३८९ कोटींची झाली आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर आणि माळेगाव या कारखान्यांमध्ये गाळप, उतारा, ऊसदर याची निकोप स्पर्धा असते. त्याचा फायदा होत आहे.


















