पुणे : जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून गाळप सुरू केले. बारामती अॅग्रो, दौंड शुगर, व्यंकटेश कृपा शुगर मिल्स, पराग अॅग्रो यांसारख्या खासगी कारखान्यांसह माळेगाव, सोमेश्वर, संत तुकाराम, विघ्नहर, छत्रपती आणि भीमाशंकर आदी सहकारी कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी २० लाख ३४ हजार ८२१ टन उसाचे गाळप केले असून, १७ लाख ४७ हजार २३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.५९ टक्के नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यात सहकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारच्या कारखान्यांची मिळून एकूण दैनंदिन गाळप क्षमता एक लाख १० हजार ५०० टन इतकी आहे. प्रत्यक्षात सध्या होणारे गाळप या क्षमतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर गाळपाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखान्यांकडून गाळपाला मिळणारा वेग, उसाची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था आणि साखर उतारा यावर यंदाच्या हंगामाचे आर्थिक गणित अवलंबून राहणार आहे. सद्यस्थितीत सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.२१ टक्के आहे. तर खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.९१ टक्के नोंदविण्यात आला आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा १.३ टक्क्यांनी अधिक आहे.


















