पुणे : साखर कारखान्यांनी उत्पादनखर्चावर नियंत्रण, बाजारपेठेचा अभ्यास करण्याची गरज; तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : ऊस उत्पादक शेतकरी हा साखर कारखानदारीचा कणा आहे. मात्र साखर कारखान्यांनी व्यापारी दृष्टिकोन ठेवून नफा मिळवला, तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होईल. शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिकचा दर देण्यास मदत होऊ शकते. कारखान्याचे आर्थिक गणित मजबूत असते, तेव्हा शेतकऱ्यांच्या एफआरपीचा हप्ता वेळेवर मिळतो, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळते. त्यामुळे कारखाना म्हणजे केवळ राजकीय सत्ताकेंद्र नसून, तो एक प्रोफेशनल कॉर्पोरेट उद्योग आहे, ही भावना सहकारी साखर कारखानदारांच्या व्यवस्थापनात रुजणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. साखर कारखान्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाळप क्षमता वाढवणे अन् उत्पादनखर्च कमी करणे, बाजारपेठेचा अभ्यास म्हणजेच साखरेचे दर तेजीत असताना योग्य वेळी विक्रीचे नियोजन करणे आणि थकबाकीमुक्त कारभार करत उपपदार्थांमधून मिळणाऱ्या रोजच्या / महिन्याच्या उत्पन्नातून ऊस उत्पादकांना वेळेवर आणि वाजवीपेक्षा जास्त दर देणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केवळ साखर निर्मितीवर विसंबून राहणारा कारखाना कधीही दीर्घकाळ फायद्यात राहू शकत नाही. केंद्र सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे (इथेनॉल ब्लैंडिंग प्रोग्राम) साखर उद्योगाला नवी दिशा मिळाली आहे. शिवाय साखरेचा साठा नियंत्रित ठेवून थेट उसाच्या रसापासून किंवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल बनवून कारखान्यांना रोख रक्कम त्वरित उपलब्ध होते आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात झालेली वाढ, केंद्र व राज्य शासनाची साखर कारखानदारीला पूरक ठरणारी धोरणे, ही साखर उद्योगासाठी एक मोठी पर्वणी ठरत आहे. मात्र, या सर्व अनुकूल परिस्थितीचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्याची गरज आहे. त्यासाठी साखर कारखानदारांनी जुनाट पारंपरिक दृष्टिकोन सोडून व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारणे आता अनिवार्य झाले आहे. बगॅसचा योग्य वापर करून वीजनिर्मिती व तिची विक्री, इथेनॉल उत्पादनावर भर या गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here