पुणे : गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊस वाहतुकदारांची बिले न मिळाल्याने ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर युनिट नंबर ११ समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पैसे दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. कारखान्याच्यावतीने १५ जूनपर्यंत पैसे दिले जातील असे आश्वासन दिले. मात्र, ऊस वाहतुकदारांनी या आश्वासनावर आंदोलन थांबविण्यास नकार दिला. यापूर्वी ५ मेपर्यंत पैसे दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नसल्याचे वाहतुकदारांनी सांगितले.
ओंकार शुगर युनिट ११ समोर ऊस वाहतुकदार शेतकऱ्यांनी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर सलग ११ तासांहून अधिक काळ ट्रॅक्टर मालकांचे आंदोलन सुरू राहिले. तरीही ट्रॅक्टर मालकांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालाच नाही. यापूर्वी कारखान्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे ऊस वाहतुकदारांचे प्रत्येकी ५ ते ७ लाखांपासून काहींचे ७० लाखांपर्यंतचे पैसे अडकले आहेत. आता नवीन गळीत हंगामासाठी अॅडव्हान्स देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामध्ये वाहतुकदारांना नवे करार करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विनाविलंब पैसे दिले जावेत अशी मागणी वाहतुकदारांनी केली आहे.


















